काना मागुन आला व तिखट झाला. हि म्हण सोशल मीडियाला तंतोतंत लागू पडते. आमच्या बालपणी वर्तमानपत्र व रेडिओ या दोनच गोष्टी मिडिया म्हणुन आम्हाला माहीत होत्या. कालांतराने दुरसंचार म्हणजे टेलिव्हिजन आला व दृश्य मिडियाचा उदय झाला. परंतु हे माध्यम आमच्या पर्यंत पोहोचेपर्यंत तरुणपणाच्या उंबरठ्यावर पोहोचलो होतो, याच काळात अमेरिकेत व इंग्लंडमध्ये कंप्युटर क्रांती सुरू झाली होती. हा तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार आमच्या पर्यंत पोहोचला तेव्हा आमची पस्तीशी पार झाली होती.
कंप्युटर बद्धल कुतूहल वाटत होते पण इंग्रजीची भीती व कंप्युटरची किंमत या मुळे त्यापासून लांब रहाणेच पसंत केले, पण मुलांच्या शालेय शिक्षणात या अभ्यासक्रमाला सुरूवात झाली, व मुलं मागे राहु नये म्हणून कंप्युटरने घरात प्रवेश केला. आमच्या पिढीचे जे उच्च शिक्षित होते ते यात पारंगत झाले होते. पण आम्हाला आपली मुलं काय करतात हे कळावे म्हणून बेसिक कोर्स करणे अपरिहार्य झाले, व थोडाफार कंप्युटर चालवायला यायला लागला. तोपर्यंत मुलं शालेय शिक्षण पूर्ण करून उच्च माध्यमिक शिक्षण घेऊ लागली होती मग इंटरनेट ची गरज भासु लागली, म्हणून ते घेणं क्रमप्राप्त झाले व पुढे मुलांनाच गुरू मानून त्याच्या कडून इंटरनेट वापरायला शिकण्यास सुरुवात केली व इथेच जगाची कवाडं खुली झाली व सोशल मीडियाशी संबंध आला.
आतापर्यंत प्रिंटमिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडिया हे एकतर्फी साधन होते जगातील सर्व बातम्या वाचता येत होत्या किंवा दुरदर्शनवर बघता ऐकता येत होत्या. परंतु त्या वर व्यक्त होता येत नव्हते किंवा त्यावर प्रतीक्रीया देता येत नव्हती. नवीन पिढी मात्र इंटरनेट मुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय झाली होती. व या साठी मुलांकडून ई मेल बनवून घेतले, फेसबुक वर अकाउंट ओपन केले सोशल मीडियाची कवाड उघडली काही काळ फक्त टाईमपास म्हणून वापर करताना लक्षात आले की हे जगाशी संपर्क साधण्याचा मार्ग आहे व याचा सद्उपयोग करून घेतला पाहिजे.
तसे इंटरनेट म्हणजे माहितीचे जाळेच आहे अशी कोणतीही माहिती नाही की जी इंटरनेट वर उपलब्ध नाही व हे एक दुधारी शस्त्र आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, भौगोलिक, औद्योगिक, आर्थिक, मनोरंजन, खेळ अशा अनेक चांगल्या माहिती प्रमाणेच वाईटातील वाईट, हिंसक, भडकाऊ, अश्शील अशा अनेक प्रकारच्या माहितीचा खजिना आहे इंटरनेट.
अनेक वेळा असे ऐकायला मिळते मुलांना इंटरनेट वापरून देउ नका कारण त्यामुळे मुल बिघडतात. पण यात अर्धसत्य सांगितले जाते परंतु याच मायाजालाचा चांगल्या व सकारात्मक पद्धतीने वापर केला तर आपल्या ज्ञानात मोलाची भर पडू शकते. अनेक गोष्टी अशा आहेत की त्याचा वापर चांगल्या पद्धतीने किंवा वाईट प्रकारे करू शकतो, जसे आग, इलेक्ट्रीसीटी, सुरी इत्यादी या सर्व गोष्टींचा वापर माणूस त्याच्या वृत्तीप्रमाणे विधायक कामासाठी किंवा विघातक कामासाठी करू शकतो.
वयोमानानुसार इंटरनेटचा वापर आपण आपल्या ज्ञानात भर पडेल असा करायचा असा विचार करून मी मुलाच्या मदतीने फेसबुक , व्हाटस्अप ट्विटर वापरायला सुरुवात केली व जाणीव पुर्वक वाईट गोष्टी टाळुन चांगले कसे आत्मसात करता येईल याकडे लक्ष दिले. माझ्या समाजबांधवांचा फेसबुक गृप तयार केला, अनेक सामाजिक गृपला सामील झालो. सर्व प्रकारचे वर्तमानपत्र फेसबुक उपलब्ध आहेत जगातील सर्व घडामोडी आपल्याला त्याद्वारे कळतात. तिच गोष्ट ट्विटर व वाटस्अप च्या बाबतीतही सांगता येईल. फक्त काही बंधने जाणीव पुर्वक पाळायचे असे ठरवले. कुठल्याही बातमीवर खातरजमा केल्याशिवाय प्रतीक्रीया नाही द्यायची किंवा पोस्ट पुढे पाठवायची नाही. कारण बरेच वेळा अफवा असतात म्हणून काळजी घ्यावी लागते.
हळूहळू या मिडीयाला जसजसा सरावत गेलो तसे काही प्रयोगही केले जसे स्वताच्या शब्दात प्रतीक्रिया देणे, स्वताचे विचार मांडणे, मत व्यक्त करणे हे सर्व करताना मुलांनी असे सुचवले की तुम्ही Blog का लिहित नाही? अगोदर वाटले हे जमणार नाही पण त्याच वेळी एक विडिओ बघण्यात आला त्यात असे ऐकले की तुम्ही निर्मिती करण्याचा प्रयत्न करा मग ते काहीही असले तरी चालेल जसे लेख, कविता, फोटोग्राफी, हस्तकला, पेंटिंग काहीही असो निर्माण करायला शिका. सुरूवातीला अवघड वाटेल पण कालांतराने अभिमान वाटेल व त्यातून मिळणारा आनंद हा वेगळाच असेल. म्हणुन हा लिखाणाचा एक प्रामाणिक प्रयत्न चालू केला आहे. अशा प्रकारे सोशल मीडियाने माझ्यावर गारूड केले आहे मला आशा आहे की मला साथ द्याल.