नमस्कार मित्रांनो एका अवघड कालखंडातुन आज आपल्या सर्वांची वाटचाल सुरू आहे. कोणी स्वप्नातही असा विचार केला नसेल की येणाऱ्या काळात सर्व कामधंदा बंद करून घरी सक्तीने रहावे लागेल. रोज कामधंद्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या लोकांना २४ तास घरात रहाणे ही कल्पनाही करवत नव्हती पण ते आता हळूहळू लोकांनी स्विकारले. जवळपास एक महिना होत आला आहे घरी राहून. कधीही रिकामे नसणारे हात व डोके सोशल मीडिया वर जास्त टाईमपास करत आहेत. त्यात काही वावगे नाही. पण प्रत्त्येक गोष्टीत चांगल्या व वाईटाचा अनुभव येतो तसेच या सोशल मीडियाचे आहे. अनेक लोक चांगले अनुभव व विचार शेअर करतात याच्या विरुद्ध काही नतदृष्ट लोक खोटी माहिती व चुकीचे विचार पसरवून आसुरी आनंद मिळवत असतात. हेच आजच्या काळात घातक सिद्ध होत आहे.
आपण सर्व सुज्ञ आहात, रामायणात प्रत्यक्ष सितामाई व रामासारखा दैवी पुरुष कांचन मृगाच्या जाळ्यात (अफवेत) फसला . तिथे आपल्या सारखे सामान्य लोक सहजच फसणार . व आजच्या कठीण काळात सर्वांनी हे लक्षात घेऊन वागले पाहिजेत. काही आसुरी विचारांचे लोक जाणुनबुजून खोटी माहिती व जुने संदर्भ नसलेले फोटो, व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर पसरवत आहेत. व आपण सर्व हे विडिओ व फोटो त्या मागची पार्श्वभूमी न तपासता नेहमीच्या सवयीप्रमाणे शेअर करतो. व हेच शब्द व दृश्य रुपी विष समाजात पसरविण्याचे पाप नकळत आपण करतो. आजच्या घडीला हे अजिबात परवडणारे नाही. मागील आठवड्यात माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांच्या भाषणाचा हाच मतीतार्थ होता. व आपण सर्वांनी मिळून या संकटावर मात करण्यासाठी हे कसोशीने पाळले पाहिजे. फेसबुक किंवा व्हाट्सप वर येणारे सगळे मेसेज खरेच असतील असे नाही. आणि बहुतेक जण याची खातरजमा करतच नाहीत. कित्येक वेळा तर न्युज चॅनल सुद्धा ऐकीव माहितीवर बातम्या प्रसारित करतात व त्यातूनच बांद्रा येथे घडलेली घटना घडली हे लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी मला आलेली पोस्ट मी जर शेअर केली नाही तर इतरांना कळनारच नाही अशा भ्रमात राहू नका. जेव्हा खात्री पटेल तेव्हा शेअर केली तर चालेल पण अफवेचे वाहक बनू नका. आफवा पसरवणे हा एक दखलपात्र गुन्हा आहे व त्यामुळे शिक्षा व दंड होऊ शकतो. व नकळत केलेली चूक महागात पडू शकते.
आपण सर्व जण मिळून हे युद्ध लढत आहोत हे विसरु नका व या युद्धात आपल्या वाट्याला आलेले कार्य म्हणजे आपण आपल्या कुटुंबीयांसह घरात रहाणे व कोरोना पासून आपले व कुटुंबीयांचे रक्षण करणे हे आहे. तसेच कोणतीही अफवा न पसरवणे किंवा इतरांना न पसरवू देणे. एवढ्या दोन गोष्टींची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्या बाकी बाहेरची लढाई लढायला आपले राज्याचे व देशाचे सेनापती समर्थ आहेत.
तेव्हा मित्रांनो सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो घरीच रहा व खात्री केल्याशिवाय कसलीही पोस्ट शेअर करु नका.