श्री. अनंत नारायण प्रभाळे

उपाध्यक्ष:- हिंदू खाटिक समाज विकास संस्था नवीमुंबई

विवाह सोहळ्यातील अनिष्ट बदल

मानवी जीवनात जन्मल्यापासुन ते मृत्यू पर्यंत १६ संस्कार केले जातात. त्यापैकी एक संस्कार म्हणजे लग्न. वयात आलेल्या सर्व स्त्री व पुरुष वर्गातील प्रत्येक जण लग्नाची स्वप्नं बघू लागतो. आपल्याला अनुरूप असा जोडीदार मिळावा असे सर्वांनाच वाटते व योग्य ती वेळ बघून म्हणजे शिक्षण संपवून स्वताच्या पायावर उभे राहून लग्नाच्या बेडीत अडकणे हे प्रत्येक उपवर तरूण तरुणींचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही जण प्रेमविवाहाचा मार्ग स्वीकारतात तर काही जण ॲरेंजम्ँरेजचा.
एकुण काय तर लग्न हा मानवी जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. लग्न करण्याच्या विधी मात्र जात, धर्म, भाषा, प्रांत या नुसार बदलत जातात. जरी हे सर्व असले तरी लग्न मात्र धुमधडाक्यात साजरे करायचे व यात कोणतीही तडजोड करायची नाही असेच सर्वांचे मत असते.


गेल्या १०-१५ वर्षांपासून काही नवीन ट्रेंड यायला लागले आहेत. हुंड्यासारख्या काही जुन्या अनिष्ट रुढी आहेतच त्यात नवीन “हळद” या नव्या समारंभाची भर पडली आहे. पुर्वी मुला-मुलीची पसंती झाली की बैठक होऊन लग्नाच्या बोलाचाली होत. त्यानंतर सुपारी फोडणे, साखरपुडा व लग्न अशी ढोबळ मांडणी होती. काही वेळा सुपारी व साखरपुडा एकत्रच होत तर बहुतेक वेळा साखरपुडा, हळदी समारंभ व लग्न एकाच दिवशी केले जाते. याप्रमाणे ३ ऐवजी २ दिवस कार्य होऊन १ कार्यक्रमाचा खर्च वाचतो. आता मात्र “हळद” हा प्रकार वेगळ्या पद्धतीने चालू झाला आहे.
विशेषतः आगरी कोळी समाज व कोकणातील ही पद्धत पण आता मात्र सर्रास इतरत्रही चालू झाली आहे. यात खटकणारी बाब म्हणजे वाढणारा अनावश्यक खर्च यात डिजे, दारू, नाच व मांसाहार
म्हणजे २५ ते ५० हजारांचा चुराडा. ज्या समाजात ही पद्धत होती त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून अशा खर्चावर सामाजिक बंदी घातली. मात्र भलत्यांनीच विनाकारण लग्नातील हा खर्च वाढवायला सुरुवात केली पैसेवाला पैसे आहेत म्हणून खर्च करतो पण गरीब कर्ज काढून हे करु लागला आहे. हे कुठं तरी थांबले पाहिजे.


आणखी एक अतिशय चुकीचा प्रकार गेले १०-१२ वर्षांपासून चालू झाला आहे तो म्हणजे मंगलाष्टके संपली की वधुवर एकमेकांना हार घालताना त्यांना उचलून घेणे व त्यांना एकमेकांच्या गळ्यात हार घालताना अडथळा निर्माण करणे. आपल्या हिंदू संस्कृतीत मंगलाष्टके संपली की वधु-वरांनी परस्परांना हार घातले की एक मुख्य विधी पार पडतो व लग्नातील सर्वात महत्त्वाचा हाच असतो. परंतु काही थिल्लर मित्र न नातेवाईक दोघांना त्यापासून रोखतात हा अतिशय विचीत्र प्रकार चालू झाला आहे व तो सर्वांनी ठरवून बंद पाडला पाहिजे. यासाठी जेष्ठ मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे व असे अनिष्ट प्रकार थांबले पाहिजेत

श्री. अनंत नारायण प्रभाळे

श्री. अनंत नारायण प्रभाळे

उपाध्यक्ष:- हिंदू खाटिक समाज विकास संस्था नवीमुंबई