श्री. अनंत नारायण प्रभाळे

उपाध्यक्ष:- हिंदू खाटिक समाज विकास संस्था नवीमुंबई

स्त्रीशक्ती एकवटणार कधी

निर्मात्याने सृष्टी निर्माण केली यात अनेकविध प्रकार, आकार निर्माण झाले. जिवसृष्टी निर्माण झाली व अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. व जेव्हा जन्म होतो त्या जिवाला मृत्यू अटळ असतो, या नियमानुसार जो जिव निर्माण झाला आहे तो काही काळानंतर नाश पावणार आहे किंवा त्याचा मृत्यू होणार आहे व तो अटळ आहे. म्हणजे एकदा जन्मलेला जिव नाश पावला की त्याचे अस्तित्व संपले. पण सृष्टीच्या निर्मात्याने या जिवावर एक जबाबदारी दिली ती म्हणजे आणखी नवे जिव जन्माला घालण्याची. पण हे काम एका जिवावर न सोपवता त्याला मदतीसाठी दुसऱ्या पण विरुद्ध लिंगी जिवाची जोड सक्तीची ठेवली. म्हणजेच सृजनशीलता किंवा नवनिर्मीतीची जबाबदारी या जिवांवर सोपवली. याच सजीवसृष्टीत कालांतराने मानवाचा जन्म झाला. या मानवी जीवनात देखील दोन भाग केले ते म्हणजे नर व मादी किंवा स्त्री व पुरुष. निसर्ग नियमानुसार या सजीवाला सुद्धा नव्या जिवाची निर्मीती करण्यासाठी दोन विरुद्ध लिंगी मानवांना एकत्र येऊन ही निर्मीती करावी लागणार होती. व हे निसर्गचक्र पुर्ण करायला हातभार लावावा लागत होता.


निसर्गचक्र चालू असताना मानवप्राणी मात्र सर्वात जास्त लवकर प्रगती करू लागला. कळपात रहात असताना गरजेनुसार उन वारा पाऊस यांपासून संरक्षण करण्यासाठी नवनवे प्रयोग करून व त्यात प्रगती करून सर्वात शक्तिशाली सजीव बनला. दगड, झाडाच्या फांद्या, व इतर अनेक विविध वस्तूंचा वापर करून घर बांधून रहू लागला. स्वताचा कुटुंबकबीला सांभाळू लागला. कालांतराने इतकी प्रगती केली की या पृथ्वीतलावर ते राज्य करू लागले. याच मानव सजिवांचा उल्लेख स्त्री पुरुष असा होउ लागला.


ही सर्व उजळणी करण्याचे कारण की स्त्री व पुरुष निर्माण एकाच वेळी झाले, दोघांनीही निसर्ग नियम पाळले म्हणुन आजवर टिकून राहीले.पण मधल्या काळात पुरुष प्रधान संस्कृती वाढीला लागली व स्त्रीचे स्थान दुय्यम होत गेले. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी पुरुष घराबाहेर जाऊन आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार व घरी राहून स्त्रीने जेवण बनवणे, मुलांचे पालनपोषण करणे अशी ढोबळ कामवाटणी झाली. आर्थिक नाड्या हातात असल्याने पुरुषी वर्चस्व प्रस्थापित झाले. व स्त्री दुय्यम होत गेली. एकत्र कुटुंबपद्धती असताना घरातील वरिष्ठ महिला सर्व गोष्टी नियंत्रणात ठेवत असत. स्वातंत्रपुर्व काळात अशीच व्यवस्था चालत होती. या मधल्या काळात हुंडा देणे घेणे सारख्या अनेक अनिष्ट प्रथा सुरू होत्या. हुंडा घेउन येणारी सुन व हुंडा न देता आलेली गरीब घरची सुन यांची तुलना करून भेदभाव केला जाऊ लागला. सुनबाईने वंशाचा दिवा नाही दिला तरी दोष फक्त तिचाच एकटीचा, व दोष देण्यात पुढाकार सासुचा म्हणजे महिलेचा. सुनबाईने घरातील सर्व कामे केली पाहिजे सासु, सासरे, दिर,जाऊ, ननंद यांचे काम करून त्यांचा आदर राखला पाहिजे. नवर्याची मर्जी राखली पाहिजेत ही अपेक्षा. पण याच्या अगदी विरुद्ध मुलगी सासरी गेली व याच सर्व गोष्टी तीला करायला लागल्या की कुरकुर सुरू माझ्या मुलीला खुपच सासुरवास होतो हे म्हणायला मोकळे. आपल्या मुलाने सुनबाईची बाजू घेतली की म्हणायचे झाला बायकोचा बैल, किंवा फितवल माझ्या एकुलत्या एक मुलाला. हेच मुलीच्या बाबतीत घडल तर मात्र आमचा जावाई देवमाणूस पण त्याची आई बहीण अतिशय नालायक, माझी मुलगी संस्कारातली म्हणुन टिकली हे म्हणायला मोकळे. पुरुष तर बायकांना किंमत देतच नव्हते. पण घरातल्या वरीष्ठ बायकाही नवीन आलेल्या सुना, जावा यांना अजीबात किंमत देत नव्हत्या. परिणामी एकमेकींमधे दुस्वास निर्माण होत गेला. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीकडे बघताना स्त्री म्हणून न बघता सासु, सुन, भावजय, ननंद अशा नात्याने बघू लागल्या यातही माझी आई, माझी बहिण, माझी मावशी चांगली पण माझी सासू, माझी ननंद, माझी भावजय,व माझी जाव या वाईटच अशा प्रकारची भावना वाढीस लागली. ( काही ठिकाणी अपवाद वगळता) एकाच घरात स्वताची मुलगी व आलेली सुन यांना वेगवेगळे नियम. स्वताची मुलगी कशी वेगळी राहील यासाठी तीला मदत करायची पण मुलगा व सुन वेगळे रहायचा विचारही करू शकत नाही अशी माणसीकता. पुरुष महिलांना कमी लेखत होतेच. महिलाही एकमेकींचा दुस्वास करत आहेत. मानसिक त्रास देत आहेत, छळ करीत आहेत या गोष्टीचा घरातील लहान मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार कधीच केला नाही. तिस चाळीस वर्षांपूर्वी हे चित्र जवळपास सर्वच घरांत थोड्या फार फरकाने दिसत होते.


मात्र मागील विस पंचवीस वर्षांत झपाट्याने वाढत असलेले शहरीकरण, व कुटुंब नियोजनाचे वाढते प्रमाण या सर्व गोष्टींचा परिणाम तसेच स्त्रीशिक्षणाचा वाढता प्रचार व प्रसार यामुळे मुलींनी शिक्षणात जबरदस्त झेप घेतली. व या शिकलेल्या मुली लग्नानंतर होणार्या त्रासाला विरोध करु लागल्या. आज अशी परिस्थिती आली आहे की मुली सर्वच क्षेत्रात मुलांपेक्षा आघाडीवर आहे.
हे सगळं झालं तरी महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी न होता उलट ते वाढतच आहे. माझ असे मत आहे की आता मात्र स्त्रीयांनी मानसिकता बदलली पाहिजे. पुरुषी मानसिकता तात्काळ बदलणार नाही कारण जसे कळत आहे तेव्हा पासून मुलांनी हेच बघीतले आहे की आपल्या आईला आजी आत्या कशी वागणूक देत आहेत काही ठिकाणी तर मुल बोलायला लागले की आईला मुद्दामहून नावाने हाक मारायला शिकवतात, शिव्या द्यायला शिकवतात ( हे मी स्वता बघीतले आहे) जर हा मुलगा आईचा मान ठेवायला शिकला नाही तर तो इतर स्त्रीचा कसा सन्मान करेल. बर हे शिकवणारे काही वेळा घरातील पुरुष असतात पण त्यांना त्या घरातील इतर महिला का रोखत नाहीत हे एक उदाहरण झाले अशी अनेक उदाहरणे देता येतील.


माझा खरा प्रश्न हाच आहे की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या बाजूने का उभी राहात नाही. तरुणपणी सासुने त्रास दिला म्हणून ती म्हातारी झाली तर तीला त्रास द्यायचा ननंद किंवा जाऊ वाईट वागली म्हणून त्यांनाही तसेच वागवायचे हे कुठंतरी बदलले पाहिजे.


मी वर उल्लेख केल्याप्रमाणे स्त्री व पुरूष निर्माण एकाच वेळी झाले व दोघांनाही निसर्गाने विशीष्ठ काम नेमुन दिले आहे म्हणजे दोघांनाही सारखेच महत्त्व आहे व दोघेही एकमेकांना पूरक आहेत मग त्या दोघांनी एकमेकांना सन्मान दिलाच पाहिजे. कोणी उच्च किंवा निच नाही तर समान आहेत. एकवेळ मी हे समजू शकतो की पुरुष महिला आपल्या पेक्षा वरचढ होऊ नये म्हणून त्यांना रोखण्यासाठी वाईट वागतो पण बायकांनी मात्र आता मानसिकता बदलली पाहिजे मी एक स्त्री आहे व दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला त्रास होत असेल तर ते मी खपवून घेणार नाही अशी भूमिका घेण्याची गरज आहे. हि माझी सासू आहे म्हणून मी तिला किंवा तिने मला त्रासच दिला पाहिजे किंवा देणार आहे. हे कुठेतरी थांबायला हवे. हेच ननंद, जाऊबाई, भावजय या नात्यांबाबतीतही म्हणता येईल.


आपल्या कडे पुराण काळापासून स्त्री ही शक्ती मानली जाते देवही या शक्तीचा आदर करत, पुजा करत. आणि निसर्गाने दोनच जाती निर्माण केल्या एक स्त्री व दुसरा पुरुष व त्यातही सर्वात महत्त्वाचे काम स्त्रीकडे सोपवले ते म्हणजे नवनिर्मिती करणे. म्हणजेच एका नव्या जिवाला जन्म देणे. व हे काम इतके कठीण आहे की आपण विचारही करू शकत नाही व हे सहन करण्यासाठी स्त्रीला मुळातच सर्वात सामर्थ्यशाली बनवले आहे. मग आजही जर समस्त स्त्रीवर्गाने एकत्र येऊन आपल्यातील सुप्त शक्ती जागृत का करु नये. जशी हनुमंताला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली व पुढे काय झाले ते सर्वांना माहीतच आहे. पण या साठी महिलांनी नातीगोती बाजूला ठेवून एकदिलाने एकत्र आले पाहिजे मी एक महिला आहे व मी कोणालाही दुसऱ्या महिलेला त्रास देवू देणार नाही. आम्ही सगळ्या मिळून एकजुटीने अन्यायाचा प्रतिकार करू. अशी भूमिका व भावना प्रत्येक स्त्रिच्या मनात रुजली पाहिजे अगदी घरातील कोणत्याही पुरुषाची हिंमत नाही व्हायला पाहिजे कुठल्याही स्त्री विषयी अपशब्द बोलण्याची. ऐवढा दरारा निर्माण झाला पाहिजे. हे जेव्हा प्रत्येक घरात घडेल तेव्हा काय बिशाद आहे मुलांनी मुलींकडे वाकड्या नजरेने पाहण्याची किंवा त्यांच्यावर आत्याचार करण्याची. तेव्हा माता भगिनींनो आपसातील वाद व स्पर्धा मिटवून एक समर्थ स्त्रीशक्ती म्हणून एकत्र या तुम्ही कालही पुजनीय होता, आजही आजही आहात व उद्याही असणार आहे हे ज्या दिवशी घडेल तो खरा महिला दिन असेल.

श्री. अनंत नारायण प्रभाळे

श्री. अनंत नारायण प्रभाळे

उपाध्यक्ष:- हिंदू खाटिक समाज विकास संस्था नवीमुंबई