पुर्वीच्या काळी शेती हा मुख्य व्यवसाय होता. लोकांना दिवस भर शेतात राबून काम करावे लागत होते. हे काम उन्हात करावे लागत व या उन्हापासून डोक्याचा बचाव करण्यासाठी एखादे फडके डोक्याला गुंडाळले जात असे ज्याला काही ठिकाणी मुंडासे असेही म्हणले जात असे. काही लोक टॉवेल बांधत तर काही लोक पटका वापरत. काही ठिकाणी टोपी वापरत तर पाटील सावकार अशी प्रतिष्ठित लोक फेटा बांधत. डोक्याचे उन्हापासून संरक्षण हाच मुख्य उद्देश होता. हा एक मान समजला जायचा. एखाद्याचा अपमान करायचा असेल तर डोक्यावरची टोपी,पटका उतरवायला लावायचे. तसेच एखाद्याचा सन्मान करायचा असेल तर टोपी, पटका किंवा फेटा घालून त्याचा सन्मान केला जात होता. साधारण ४० ते ५० वर्षींपुर्वी खेडेगावात शाळेत टोपी सक्तीची होती. कालांतराने जसजशा सुधारणा होत गेल्या शहरीकरण होत गेले, तसतसे टोपी, फेटे ई. वापर बंद होत गेला. व या गोष्टींची गरज संपत गेली. परंतु मानसन्मान करण्यासाठी लग्नसमारंभात टॉवेल टोपी देण्याची पद्धत मात्र चालूच राहिली. ही टॉवेल टोपी यजमान पाहुण्यांना देउन त्यांचा सन्मान केला जायचा व पाहुण्यांकडूनही तशीच परतफेड केली जात होती ते यजमानांना टॉवेल टोपी देवून सन्मानित करायचे. एक काळ असा होता की टोपी रोजच्या जीवनात वापरली जात होती. तेव्हा या टोपीचा वापर व्हायचा पण काळाच्या ओघात शहरातच काय खेडेगावातूनही टोपी हद्दपार झाली व फक्त मानसन्मानापुरती उरली. वारकरी संप्रदाय सोडला तर टोपीचा वापर नसल्यातच जमा झाला आहे.
परंतु पुर्वीपासून चालत आलेली लग्न समारंभात टॉवल टोपी देण्याची पद्धत मात्र तशीच चालू राहीली. लग्न समारंभात किमान १०० ते २०० टॉवेल टोप्या वधूपक्ष व वरपक्ष प्रत्येकी दोघांनाही खरेदी करायला लागले. तसेच जे पाहुणे मंडळी निमंत्रित असतात त्यांच्या पैकी बरेच लोक कपड्यांचा आहेर आणतात व हा आहेरही टॉवेल टोपी शिवाय पुर्ण होत नाही म्हणून त्यांनीही या टॉवेल टोपीची खरेदी करायची. बरं मान म्हणून मिळालेल्या या टॉवेल टोपीचा वापर ना देणारे करतात ना घेणारे. दोन मिनिटात डोक्यावरची टोपी काढून टाकली जाते व हे टॉवेलही काहीच कामाचे नसतात फक्त पैशाचा अपव्यय होतो.
हे कमी म्हणून की काय गेल्या दहा पंधरा वर्षांपासून फेटे बांधण्याची टुम निघाली. श्रीमंत व प्रतिष्ठित लोकांमध्ये चालू झालेली ही प्रथा आता सामान्य माणूस सुध्दा करायला लागला आहे. निव्वळ तो करतोय म्हणून मी पण केले पाहिजे असाच या मागचा उद्देश.
टॉवेल टोपीला २० ते ३० रुपये खर्च येत होता मात्र फेट्याला ६० ते १०० रुपये खर्च येत आहे. व हा फेटा बांधून झाल्यावर डोक्यातुन काढला की निरुपयोगी ठरतो साधी लादी पुसायला सुध्दा वापरु शकत नाही.
फक्त पुर्वांपार चालत आलेली परंपरा म्हणून आपण आणखी किती दिवस हा अनाठायी खर्च करत रहायचा. आपल्या कडे आजही ७० ते ८० टक्के लोक कर्ज काढून लग्न समारंभ पार पाडतात. व जरी ऐपत नसली तरी “लोक काय म्हणतील” म्हणुन असल्या कालबाह्य प्रथा वर्षानुवर्षे पाळत आहेत. हे कुठं तरी थांबले पाहिजे अशी आता वेळ आली आहे व यावर सर्वांनीच विचार करायला हवा. हि प्रथा जेव्हा चालू झाली तेव्हा कदाचित ती गरज असेल पण आता काळ बदलला आहे पेहेरावा पासून ते वागण्या बोलण्यात कमालीचा फरक पडला आहे. मग अनावश्यक गोष्टी चालू ठेवण्यासाठी अट्टाहास नको.
पुर्वी हुंडा पद्धत होती व ती त्या काळातील कदाचित गरज असेल परंतु कालानुरूप सरकारने या पद्धतीवर कायदा करून बंदी घातली आहे. पण अजुनही काही महाभाग हुंड्याची अपेक्षा करतात. हे चुकीचे आहे आज मुलं मुली असा भेदभाव राहिलाच नाही उलट मुलींनी शिक्षणात मुलांना मागे टाकले आहे प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत त्यामुळे आजच्या जमान्यात हुंडा मागणारे पालक चुकत आहेत. त्यामुळे संपूर्ण हुंडाबंदी झालीच पाहिजे.
आजकाल एक नवीनच खूळ डोक्यात शिरले आहे ते म्हणजे लग्नाच्या एक दिवस अगोदर “हळद”. कारण नसताना एक खर्चिक कार्यक्रम वाढवून ठेवलाय. हि प्रथा ज्या समाजात खुप दिवसांपासुन चालू होती त्या आगरी कोळी समाजातील लोकांनी ठराव करून या प्रथेला विरोध केला आहे व खर्चिक “हळद समारंभ” बंद केले. पण ही गोष्ट आपण लक्षात घेत नाही व दिवसेंदिवस हा प्रकार वाढतच चालला आहे. अशा अनेक चुकीच्या प्रथांना मोडीत काढण्याची गरज आहे. व या साठी समाजाने एकत्र येऊन काही ठोस पावले उचलली पाहिजेत. या विषयावर लवकरच एक चर्चासत्र आयोजित करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत व अशी अपेक्षा करतो की महाराष्ट्रातील समाज बांधव नक्कीच आमच्या मागे उभा राहिल