आज ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन. मनुष्य जसजशी प्रगती करत आहे तसाच तो नकळतच अधोगती कडे वाटचाल करत आहे व स्वास्थ्य हरवत आहे. ऐखादा वयस्कर व्यक्ती ठणठणीत असेल तर आपण असे म्हणतो यांनी जे खाल्लेलं आहे ते आपण बघीतले सुध्दा नाही. याचा अर्थ आत्ता कुठे माझ्या लक्षात येवू लागला आहे. ऐक काळ असा होता की खेडेगावातील जिवन शेती वर अवलंबुन होते. दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती, शेती करणे त्यातूनच आपली उपजीविका करणे. सोबतीला बारा बलुतेदार पद्धती होती. आर्थिक देवाण-घेवाण नसली तरी सर्व व्यवहार सुरळीत चालत हो एकत्र कुटुंब पद्धती होती शेती हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते. दारी गोठ्यात गाई, म्हशी, बैल अशी दुभती जनावरे असायची. शेती साठी लागणारे बी बियाणे कसदार मिळत असे. नैसर्गिक पद्धतीने शेती होत होती. खत म्हणून शेणखत, गांडूळ खत वापरले जायचे. शेतातीलच वैरण गुरांना चारा म्हणून मिळत होती.
पण इंग्रजांच्या काळात कारखाने सुरू झाले व पुढे शहरीकरणामुळे खेड्यात राहणारे लोक पैसे मिळवण्यासाठी शहरात येवू लागले. स्वातंत्र्यानंतर हा ओघ वाढला. शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती व काही वेळा पाऊस कमी झाला की उत्पन्नावर परिणाम होत असे. याच वेळी हरित क्रांती झाली आधुनिक रासायनिक खतांचा वापर सुरू झाला. नवनवीन संकरीत बियाणे तयार करण्यात आले व इथुनच र्हासाला सुरवात झाली. हरित क्रांती झाली पण एका नव्या स्पर्धेला सुरुवात झाली रासायनिक खतांचा वापर मर्यादा ओलांडून होऊ लागला, युरियाचा वापर दिवसेंदिवस वाढतच गेला. वेगवेगळ्या किटकनाशकांचा शोध लागला व वापर चालू झाला. निरनिराळी औशधे शेतीवर फवारणी साठी उपलब्ध झाली. जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी काही घटकांनी नकली खत व औषधे बाजारात आणली.
शेती व्यवसाय करणारे बहुसंख्य शेतकरी कमी शिकलेली किंवा अशिक्षित असल्याने फसवणूक व्हायला लागली. खोट्या जाहिरातींना भुलून व शिक्षणाचा अभाव असल्याने कोणते खत कोणत्या पिकांसाठी वापरावे, त्याचे प्रमाण किती असावे, त्यावर कोणत्या औषधांची फवारणी करावी अशा अनेक गोष्टींची जनजागृती व्हायला पाहिजे होती, कार्यशाळा घेतल्या गेल्या पाहिजे होत्या. पण दुर्दैवाने त्याकडे पाहिजे तितके लक्ष नाही दिले गेले. जास्त खत वापरली तर उत्पन्न जास्त निघेल असा विचार करून प्रमाणापेक्षा जास्त रासायनिक खते व औषधे वापरली जावू लागली. व अशा प्रकारे शेतीचे व्यवसायीकरण वाढले . जास्तीत जास्त पिक उत्पादन घेण्याच्या नादात त्या पिकातील कस नाहीसा झाला. चव बिघडली, वेगवेगळ्या औषधांच्या, जंतुनाशकांच्या फवारणी मुळे त्या औषधाची मात्रा पिकातही उतरु लागली. व ईथुनच मानवी जीवनावर त्याचा परिणाम दिसू लागला. नवनवीन आजार होऊ लागले. कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढायला लागले.
हे झाले प्रत्यक्ष शेतीमालावर दिसणारे परिणाम, पण त्याचबरोबरीने येणारे अप्रत्यक्ष परिणाम वेगळेच आहेत. जसे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुधदुभती जणावरे पाळणे, शेळीपालन व्यवसाय , कुक्कुटपालन व्यवसाय या सर्व गोष्टींवर याचे परिणाम दिसू लागले कारण गुरांना लागणारी वैरण किंवा खाद्य यातील रासायनिक खतांचा व औषधांचा अंश असल्याने जे दुध मिळत होते त्या दुधातही तो अंश उतरू लागला. सकस आहार म्हणून हेच दुध लहान बाळापासून ते आजारी व्यक्तीला आपण देत असतो.
आजचे शेतकरी ४५ दिवसात येणारे पालेभाजीचे पिक २१ दिवसांत कसे तयार होईल ते पहातात. त्यासाठी औषधे आहेत पालेभाज्या पिवळ्या रंगाच्या होऊ नयेत हिरव्या रंगाच्या व्हाव्यात म्हणून औषधे फवारतात. किड लागु नये म्हणून फवारणी करतात. पिक जास्त यावे म्हणून फवारणी करतात.व ही सगळी औषधं काही प्रमाणात का होईना आपल्या पोटात जातात. याचा साईड इफेक्ट काही काळानंतर दिसणारच आहे.
हे झाले शेतीबाबत, पोल्ट्री फार्म व्यवसायात पिल्ले लवकर वाढावी म्हणून इंजेक्शन दिले जाते. वजन वाढावे म्हणून वेगळे इंजेक्शन दिले जाते. पिल्लांना खाद्य म्हणून जे त्यातही औषधे टाकतात. हेच चिकन सर्व शहरांमध्ये पुरवले जाते. यामुळे कोणते आजार उद्भवतील हे वेगळे सांगायला नको.
हे झाले शेतीबाबत आता गावागावात MIDC होऊ लागली आहे यातील कंपन्या रासायनिक सांडपाणी खुलेआम नदी मध्ये सोडून देतात व पुढे हेच पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी वापरतात परिणाम काय होतील वेगळे सांगायला नको. मुंबईत रेल्वेच्या बाजूला पिकविलेल्या पालेभाज्या अशाच घातक आहेत
या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी उच्चस्तरीय कारवाई व्हायला हवी ती सध्यातरी अवघडच आहे व याचा परिणाम म्हणजे कदाचित आणखी १० ते १५ वर्षांनी प्रत्येक घरात एक कर्करोगाचा रुग्ण असू शकतो सरकारने या सर्व गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर ठोस पावले उचलली पाहिजेत व नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतकरी बांधवांना प्रवृत्त केले पाहिजे. आज जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने सरकारने व शेतकरी बांधवांनी यांच्यावर उपाय योजना केल्या पाहिजेत